MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

आचार्य बाळशास्त्री जांभेकर- Balshastri Jambhekar mpsc Information


  आचार्य बाळशास्त्री जांभेकर (इ. स. १८१०-१८४६)

स्वतःच्या कुटुंबाच्या योगक्षेमाची आद्य जबाबदारी प्रथम पाहून नंतर राष्ट्राच्या जबाबदारीकडे लक्ष घालणारे व ती पार पाडणारे अनेक महापुरुष होऊन गेले. आजही काही तसे आढळतात. तथापि, असे काही महाभाग आहेत की जे आपल्या ध्येयापायी कुटुंब पोषणाची जबाबदारी दुय्यम मानून सर्वस्वी ध्येयपूर्तीकरिता स्वत:स वाहून घेतात. अशा ध्येयनिष्ठ वर्गापैकी आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे एक होत. देशात परकीय राजघट स्थिर झाली. नवीन उंचावलेल्या ज्ञानाच्या कक्षा व संस्कृती यांचे पदार्पण झाले. त्यामुळे समाजाची द्विधा मनःस्थिती झाली. तो अंधारात चाचपडू लागला. अशा परिवर्तनाच्या काळात धैर्याने आणि व्यापक दृष्टीने विचार करून समाजाला जागृत करणारा आणि मार्ग दाखविणारा तारा म्हणून जांभेकरांच्याकडे पाहिले जाते. आपले राज्य का गेले आणि इंग्रजांचे राज्य या देशात का आले याचे अचूक निदान त्यांनी केले. ज्ञानाचा व विज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे, त्याशिवाय सामर्थ्य निर्माण होणार नाही हे जाणलेला तो ज्ञानयोगी होता. त्यांना प्रचंड बौद्धिक सामर्थ्य लाभले होते.

 जीवन वृत्तांत 

बाळशास्त्री जांभेकर आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले या खेडेगावी इ. स. १८९० मध्ये झाला. (काही ठिकाणी हे साल इ. स. १८१२ असे आहे.) ते एका व्युत्पन्न पुराणिकाचे सुपुत्र होते. वयाच्या बारा-तेरा वर्षांपर्यंत त्यांनी संस्कृत आणि मराठी भाषेचे अध्ययन पूर्ण केले. पुढे ते इंग्रजी शिकण्यास मुंबईस दाखल झाले. थोड्याच दिवसात त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले. इतर विषयांतही त्यांनी वाखाणण्याजोगी प्रगती केली. शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच ते गणिताचे शिक्षक झाले. त्यांनी संस्कृत, इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, गुजराती, बंगाली आणि फारशी या विषयांचे ज्ञान संपादन केले होते.

शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर ते बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी झाले. लहान वयातच त्यांनी हा सन्मान मिळविला होता. त्यानंतर त्यांची सरकारमार्फत अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून नेमणूक झाली. तेथेच त्यांनी कानडी भाषा आत्मसात केली. याच सुमारास मुंबईचे पहिले गव्हर्नर एल्फिन्स्टन यांच्या स्मरणार्थ 'एल्फिन्स्टन कॉलेज' काढण्यात आले. तेथे त्याची असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्रीयन विद्वानाला तो यथोचित मान मिळाला होता असे म्हणावयास काहीच हरकत असू नये. तेथे ते बीजगणित व ग्रहगणित हे विषय शिकवीत होते. पुढे त्यांची शिक्षकांच्या अध्यापन वर्गांचे 'डिरेक्टर' आणि मुंबई इलाख्यातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली. विविध पदांवर काम करीत असतानाही त्यांनी इतिहास संशोधनातही भाग घेतला होता. इ. स. १८४६ मध्ये प्राचीन शिलालेखांच्या वाचनासाठी वनवेश्वरला गेले असता तेथे त्यांना तापाने पछाडले. त्यातच त्यांचे आकस्मित निधन झाले.

 शैक्षणिक कार्ये 

बाळशास्त्री व्यासंगी व अनेक विषयांचे ज्ञान असलेले अभ्यासक होते. त्यांना शिक्षणक्षेत्राशी निकटचा संबंध होता. महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली. इंग्रजी शिक्षण, स्त्री शिक्षण व पाश्चात्य ज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला. ते बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि सरकारच्या शिक्षण खात्यात त्यांनी काम केले होते. त्याकाळी ज्ञानाची साधने मर्यादित होती. मुद्रणकलाही बाल्यावस्थेत होती. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार केली. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी पाठ्यपुस्तके रचली. गणित आणि विज्ञान यांतही त्यांची प्रगती होती. त्यांनी 'शून्यलब्धि' हे पुस्तक मराठी भाषेत लिहिले. बाळशास्त्री जांभेकरांचे शिष्य केशवराव भवाळकर यांनी आपल्या चरित्रात जांभेकरांनी शिक्षकांना केलेला उपदेश दिला आहे. त्यावरून त्यांचा विशाल दृष्टिकोण स्पष्ट होतो. ते म्हणतात, "पूर्वकाळचे महाप्रबुद्ध ऋषिजन हे अरण्यवास पत्करून विद्यासंपन्न होत आणि विद्यादान करीत. त्यांनी आपल्या देशात अपूर्व ज्ञानभांडारे भरून ठेवली आहेत. ती इतकी तुडुंब आणि ओतप्रोत आहेत की, ती नुसती चाळावयाला संबंध जन्म पुरावयाचा नाही. त्या ऋषीचे आपण वंशज म्हणवतो, मग विद्याभ्यास अन् विद्यादान करण्याची आपणास का लाज वाटावी ? विद्या शिकून तुम्हाला कारकून किंवा अंमलदार व्हावेसे वाटते, शिक्षकाचा व्यवसाय लोक हलका मानतात, पण तसे नाही. प्रजा, मूक आहे म्हणून सरकारी नोकरांचे महत्त्व. विद्या प्रसार जसजसा होत जाईल तसतसे सरकारी नोकरांचे ढोंगसोंग अन् थाटमाट नाहीसा होईल. प्रजा शहाणी आणि समजूतदार झाली म्हणजे कारकुनीला कोण विचारतो ? म्हणून विद्याभिलाषि व्हा, विद्याभ्यास करा. लोकांना सुशिक्षण द्या, स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान लोकांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करा." या उपदेशावरून त्यांच्या शिक्षणाविषयी विचाराची कल्पना येते.

 वृत्तपत्र व वाङ्मयीन क्षेत्रातील कार्य 

 बाळशास्त्री एक बुद्धिमान आणि विद्वान पुरुष होते. त्यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनाचा पाया घातला. वृत्तपत्र ही जनजागृतीसाठी सार्वजनिक जीवनातील प्रचंड शक्ती आहे हे ओळखून 'दर्पण' हे १८३२ मध्ये मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले. इंग्रजी व मराठी भाषेत ते निघत होते. त्यांनी समाजाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे विचार त्यातून मांडले आहेत. स्त्री शिक्षण, पाश्चात्य ज्ञान, विधवा विवाह, शुद्धिकरण इत्यादी सुधारणांचा त्यांनी त्यातून पुरस्कार केला. 'दर्पण' च्या दुसऱ्या अंकात त्यांनी वृत्तपत्रांच्या सामर्थ्याविषयी लिहिले आहे ते असे, "ही शक्ती आपल्या देशात पूर्वी असल्याचा दाखला नाही. सर्व जगामध्ये पाश्चात्त्य राष्ट्रांची जी प्रगती झाल्याचे आपणास दिसते त्याचे प्रमुख कारण म्हणजे ज्ञानप्रसाराचे आणि लोकजागृतीचे अद्भुत साधन आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे, सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, जनतेला त्यांची कर्तव्ये सांगणे, राज्यकत्यांच्या हुकूमशाहीला लगाम घालणे हे सामर्थ्य वृत्तपत्रांच्या अंगी आहे.

ज्या देशात वृत्तपत्रांना लोकांच्या मनावर परिणाम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे तो देश खचित धन्य होय.” शिक्षण हे समाजसुधारणेचे प्रभावी साधन आहे असे त्यांनी प्रभावीपणे मांडले आहे. शिक्षणामुळे प्रतिगामी आणि सनातनी मतांचा लोकांच्या मनावर जो पगडा पडला आहे तो दूर होईल, तसे झाल्याशिवाय समाजाची प्रगती नाही. जीवनाकडे उदार दृष्टीने पाहिले पाहिजे. 'दर्पण' या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले. सरकारच्या अन्यायी व अत्याचारी धोरणावरही त्यांनी टीका केली. जनतेतील दोष, त्यांच्या अडाणी समजुती दूर करण्याचे प्रयत्न केले. 'दर्पण' बंद होण्याच्या सुमारास म्हणजेच १८४० मध्ये त्यांनी 'दिग्दर्शन' नावाचे मराठी मासिक सुरू केले. विज्ञानाचा लोकांच्यात प्रचार करणे हा त्यामागील उद्देश होता. या मासिकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे, " विद्या मनुष्यमात्रास उपयोगी आहे. विद्येपासून कीर्ती, द्रव्य यांचा लाभ होतो. विद्येमुळे पुरुषाचा बहुमान होतो. विद्या श्रीमंतास भूषण, गरिबास पोटास साधन, तरुणास उत्तम उद्योग, वृद्धास विश्रांती आणि सर्वांस मोक्षप्राप्तीचा उपाय आहे." यावरून त्यांचा शिक्षणविषयीचा दृष्टिकोण स्पष्ट होतो. त्यांचे कार्य व गुण पाहूनच सरकारने त्यांना “जस्टिस ऑफ पीस" हा बहुमान बहाल केला होता.

साहित्यिक गुण, विद्वता आणि अनेक विषयांचा गाढा अभ्यास यांमुळे जांभेकरांनी इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, व्याकरण व विज्ञान इत्यादी विषयांवर पुस्तके लिहिली. भारतीय शिलालेख आणि ताम्रपटांचे संशोधन व वाचन करून अनेक निबंध लिहिले. त्यामुळे त्यांना “आद्य इतिहासकार" मानले जाते. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वाङ्मयीन कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन होय. जांभेकरांच्या विद्वतेला कल्पकतेची व लोक कल्याणाची दृष्टी होती. बाल व्याकरण, नीतिकथा, सार संग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, संध्येचे भाषांतर, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इत्यादी त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत.

 सामाजिक कार्य 

त्या काळातील एकूण विचारसरणींचा विचार करता बाळशास्त्री जांभेकर सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातही बरेच आघाडीवर होते. इंग्रजांच्या आगमनाबरोबर इंग्रजी विद्या, त्यांचा धर्म व संस्कृतीही भारतात आली. त्यामुळे इंग्रजी शिक्षणाबरोबरच ख्रिस्ती धर्माचाही प्रसार भारतात होऊ लागला हे जांभेकरांच्या लक्षात आले. ते पाश्चात्त्य ज्ञान व इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. मात्र त्यांना हिंदू संस्कृतीचा आणि धर्माचा अभिमान होता. सनातनी विचारांचे आणि आचारांचे मात्र त्यांना वावडे होते. धर्मभावनेला उदार बनविले पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्याकाळात जनता अडाणी होती. विद्वान प्रतिगामी होते. धर्माच्या अवडंबराचा समाजावर प्रभाव होता. अशा वेळी त्यांनी मांडलेले विचार खचितच समाजाला उद्द्बोधक होते. हिंदू धर्मातील वाईट प्रथा बंद पाडाव्यात असे त्यांना वाटत होते. विधवा विवाह, स्त्री-शिक्षण यांबाबत ते आग्रही होते. हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना परत शुद्ध करून स्वधर्मात घ्यावे असे त्यांचे स्पष्ट विचार होते. या विचाराशी निगडित असे श्रीपती शेषाद्री यांचे प्रकरण उद्भवले. शेषाद्री या ब्राह्मणाची नारायण व श्रीपाद अशी दोन मुले होती. मिशनऱ्यांच्या शाळेतील सहवासामुळे नारायणने धर्मांतर केले. ही घटना मुंबईत खळबळ उडवून देणारी ठरली. श्रीपादने धर्मांतर करू नये म्हणून जांभेकरांनी त्याच्या वडिलांना पु करून सुप्रीम कोर्टाकडून ताबा मिळविला. परंतु तो काही दिवस मिशन यांच्या सहवासात राहिला असल्यामुळे तो भ्रष्ट झाला आहे असा सनातनी लोकांनी दावा केला. शास्त्रोक्त पद्धतीने प्रायश्चित होऊन श्रीपादला हिंदू धर्मात घेता येईल असे बाळशास्त्री जांभेकरांनी मत मांडले. परंतु काही सनातनी पंडितानी एकदा भ्रष्ट झालेला हिंदू शुद्ध करून घेण्यास शास्त्राची अनुमती नाही असे मत मांडले. मात्र जांभेकरांनी श्रीपादला काशीला पाठवून स्वधर्मात शुद्ध करून घेतले. त्याचा परिणाम म्हणून सनातनी लोकांनी शास्त्रींना बहिष्कृत केले. त्यांचा फार मोठ्या प्रमाणात छळ केला. समाजात फूट पडणे धोक्याचे आहे हे ओळखून शास्त्रींनी प्रायश्चित्त करून घेतले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा या बुद्धिवादाने आणि तारतम्याने करावयास पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांना "आद्य समाज सुधारक" म्हणून ओळखले जाते.

  योग्यता  

परकीय अंमलात राष्ट्र जागृतीच्या क्षेत्रात विविध आघाड्या उघडणारे बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे द्रष्टे महापुरुष होते. त्यांच्या विद्वत्तेचा व कर्तृत्वाचा सर्वत्र दबदबा होता. व्यासंगी, विद्वान, इतिहास संशोधक, चारित्र्यवान शिक्षक, पुरोगामी समाज धर्मसुधारक, लेखक व वृत्तपत्रकार या दृष्टीचे त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यांनी स्त्री-शिक्षण, विज्ञानाचा प्रसार, विधवा विवाह, शुद्धीकरण चळवळ इत्यादींचा पुरस्कार केला. लोकजागृतीचे कार्य केले. समाजाचा दृष्टिकोण विशाल, उदार व चिकित्सक बनल्याशिवाय प्रगती होणार नाही म्हणून त्यांनी 'दर्पण', दिग्दर्शन' यांसारखी वृत्तपत्रे व मासिके सुरू केली आपल्या लेखनाद्वारे त्यांनी आपल्या बुद्धीची झेप दाखविली. आपल्या समाजाच्या उन्नतीसाठीच त्यांची ही धडपड होती. त्यामुळेच त्यांना 'आद्यसुधारक', 'मराठी वृत्तपत्राचे जनक,’ ‘आद्य इतिहास संशोधक, 'सुधारणावाद्याचे प्रवर्तक' 'व्यासंगी पंडित' अशा शब्दांनी गौरविले जाते. त्यांच्या संदर्भात हर्डीकर म्हणतात, 'निरपेक्षपणे संपूर्ण आयुष्यभर सर्व प्रकारची झीज सोसून लोकशिक्षण, वाङ्मय व इतिहास यांची एकनिष्ठेने सेवा करणारा असा त्यागी कार्यकर्ता फार विरळा. जांभेकरांच्या आयुष्याचे सिंहावलोकन केल्यास त्यात देशभक्ती, लोकसेवेची तळमळ, तत्त्वनिष्ठा व तिच्यासाठी त्याग करण्याची तयारी, लेखनचातुर्य, व्यासंग, चिकाटी इत्यादी सद्गुण प्रकट झालेले आढळून येतात.

महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांची कार्ये व माहिती

☯️ आधुनिक मुंबईचे शिल्पकार - जगन्नाथ शंकर शेठ (नाना)

☯️ मराठी वृत्तपत्राचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

☯️ मराठी भाषेचे पाणिनी- दादोबा पांडुरंग तर्खडकर 

☯️ लोकहितवादी- गोपाळ हरी देशमुख 

☯️ महाराष्ट्राचे धन्वंतरी - डॉ. भाऊ दाजी लाड 

☯️ विष्णुशास्त्री पंडित 

☯️महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग - महात्मा ज्योतिबा फुले

☯️भारतीय राज्यघटनेचे जनक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा