MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती-Dadoba Pandurang Tarkhadkar mpsc

 


 दादोबा पांडुरंग तर्खडकर

दादोबा पांडुरंग तर्खडकर हे महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक, व्याकरण आणि भाष्यकार, किंबहुना स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार म्हणून त्यांना अग्रमान दिला जातो. 'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांचे साहित्य हे मौलिक, रसपूर्ण आणि विचारप्रवर्तक आहे. समाजप्रबोधनातही त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी शिक्षण आणि धर्म या क्षेत्रात नाविन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. -

 जीवन वृत्तांत 

 दादोबा पांडुरंगाचा जन्म मुंबई येथे इ. स. १८१४ मध्ये झाला. त्यांचे घराणे हे मूळचे वसई जवळील तर्खड येथील. त्यामुळेच त्यांना तर्खडकर म्हणून ओळखले जात होते. वैश्य जमातीतील ते होते. त्यांचे आजोबा व्यवसायानिमित्त मुंबईत आले व तेथेच ते स्थिर झाले. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग व आईचे नाव यशोदाबाई असे होते. त्यांच्या घरातील वातावरण धार्मिक होते. तसे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण खाजगी शाळेत झाले. त्याचबरोबर वडिलांच्याकडूनही त्यांना काही शिक्षण मिळाले. इंग्रजी शिक्षणासाठी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ते दाखल झाले. दरम्यानच्या काळात त्याकाळातील प्रथेप्रमाणे त्यांचा विवाह झाला. शिक्षण चालू असतानाच त्यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाचे पुस्तक लिहिले. १८३५ पासून त्यांनी नोकरीत पदार्पण केले. काही काळ ते जावरा संस्थानच्या नबाबाचे शिक्षक होते. त्यानंतर १८४० ला एल्फिन्स्टन इन्स्टिटयूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून दाखल झाले. सुरत येथे त्यांची बदली झाली. १८४६ मध्ये बाळशास्त्री जांभेकर मृत्यू पावले त्यामुळे ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टरची जागा मोकळी झाली. त्या जागेवर दादोबा पांडुरंगाची नियुक्ती झाली. १८५२ मध्ये अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर पदावर नेमणूक झाली. भिल्लांच्या बंडाचा यशस्वीपणे मोड केल्यामुळे त्यांना रावबहादूर ही पदवी सरकारने देऊन सन्मानित केले. १८६२ मध्ये ते निवृत्त झाले. पुढे त्यांनी व्यवसायात पदार्पण केले. परंतु त्यात त्यांना फारसे यश लाभले नाही. त्यांनी सरकारी खात्यात भाषांतरकार म्हणून काही काळ काम केले.

दादोबा पांडुरंगांनी आपली नोकरी सांभाळत सार्वजनिक कार्यांकडे विशेष लक्ष दिले होते. त्यांनी राजकारण, समाजकारण व धर्मकारणामध्ये हिरिरीने भाग घेतला. त्या काळातील समविचारी लोकांना एकत्रित करून त्यांनी मानवधर्मसभा, परमहंस सभा, बॉम्बे असोसिएशन, सरकारी पुस्तक समिती इ. संघटना स्थापून त्यात सक्रिय भाग घेतला. त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. उतारवयात त्यांची एका मागोमाग एक अशी दोन मुले वारली. त्या धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यातच त्यांचा इ. स. १८६२ मध्ये अंत झाला.

 सामाजिक व धार्मिक सुधारणेचे कार्य

 समाजसुधारणेच्या चळवळी भारताच्या इतिहासात अनेक झाल्या आहेत. परंतु १९ व्या शतकाच्या प्रारंभी झालेली चळवळ सर्वात अधिक दूरगामी व व्यापक स्वरूपाची होती. हिंदू समाज विस्कळीत झाला होता. धार्मिक जीवन गतिहीन बनले होते. समाजात फार मोठी विषमता होती. अनेक अघोरी कृत्ये धर्माच्या नावावर होत होती. दादोबांचे व्यक्तिमत्त्व, धार्मिक प्रवृत्ती व बालपणापासूनचे संस्कार यांमुळे त्यांनी समाज सुधारणेच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांनी समाजजीवन गतिशील बनविण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी विद्येच्या प्रसारामुळे महाराष्ट्रात एक नवशिक्षितांचा वर्ग अस्तित्वात आला होता. त्यांना ख्रिश्चन धर्मातील चांगल्या गोष्टीबद्दल आकर्षण होते. मिशनऱ्यांच्या सेवाभावी व मानवतावादी कार्याने असे तरुण भारावलेले होते. मात्र ते हिंदू धर्माभिमानी होते. त्यांनी स्वधर्मात चांगल्या तत्त्वप्रणाली स्वीकारण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले. दादोबा पांडुरंगांनी आपले विचार पटणाऱ्या लोकांच्या मदतीने मानवधर्म व परमहंस सभा स्थापन केल्या. मिशनरी लोकांचे प्रयत्न व सरकारचे प्रोत्साहन यांमुळे अनेक लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारीत होते. त्यामुळे महाराष्ट्रात धर्मांतरांची लाटच उसळली होती. त्यावेळी दादोबा पांडुरंग यांनी जांभेकरांच्या मदतीने श्रीपाद शेषाद्री याला शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेतले. त्यावरून त्यांची धर्मविषयक मते स्पष्ट होतात. उदारमतवादी व समतावादी मते त्यांनी मांडली. आपल्या धर्मात अनेक वाईट प्रथांची बजबजपुरी माजली आहे. ती दूर सारून तिला शुद्ध स्वरूप दिले पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते होते. देशबांधवांना खरा धर्म समजावा म्हणून त्यांनी पुढील उपक्रम हाती घेतले.

 (अ) मानवधर्म सभा  

सुरत येथे काम करीत असताना दादोबा पांडुरंग यांनी, नवसुशिक्षित लोकांच्या साहाय्याने "मानवधर्म सभा " इ. स. १८४४ मध्ये स्थापन केली. त्यात दुर्गाराम मंघाराम मेहता, दिनमणी शंकर दलपतराय यांसारखी मंडळी होती, त्या सभेचे दादोबा पांडुरंग हे अध्यक्ष होते. या सभेने सामाजिक सुधारणेसाठी पुढील सात धर्मतत्त्वे सांगितली होती.

१. ईश्वर एक आहे.

२. परमेश्वर भक्ती करावी हाच धर्म आहे.

३. मनुष्यमात्राचा धर्म एक आहे.

४. प्रत्येकास विचारस्वातंत्र्य आहे.

५. सर्वानी विवेकाने व सदाचाराने वागावे.

६. सर्वांची जात एक आहे.

७. सर्वांनी शिक्षण घ्यावे.

 या संघटनेतील सदस्यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. त्यांचा जाती संस्थेला विरोध होता. या सभेतील आचार विचार अतिशय उदार व समता - मानवतावादी होते. हिंदू धर्माला शुद्ध स्वरूप आणण्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न होते. दादोबा पांडुरंग यांनी या सभेच्या प्रचारासाठीच 'धर्मविवेचन' हा ग्रंथ लिहिला. पुढीलकाळात या संस्थेच्या विकासासाठी निरपेक्ष भावनेने झटणारे लोक लाभले नाहीत त्यामुळे ती संपुष्टात आली.

 (ब) परमहंस सभा

मानवधर्म सभेतीलच काही अनुयायांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी इ. स. १८४९ मध्ये मुंबई येथे 'परमहंस सभा' स्थापन केली. या सभेची तत्त्वे मानवधर्म सभेसारखीच होती. आत्माराम पांडुरंग, भाऊ महाजन यासारखी सुधारक मंडळी या सभेमध्ये होती. जातिभेद मोडून काढण्याचा निर्धार या सभेने केला होता. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा मोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही सभा जातिभेद मानत नसे. मूर्तिपूजा त्याज्य मानी. एकेश्वरवादाचा पुरस्कार करी. अनेक शहरात या सभेच्या शाखा उघडलेल्या होत्या.

परमहंस सभेने जातिभेदाचा निषेध केला होता. म्हणून या सभेतील सर्व लोक प्रार्थना । झाल्यानंतर अस्पृश्य आचान्याने तयार केलेले भोजन घेत. ख्रिस्ती माणसाने बनविले पाव : खाल्ल्याशिवाय, मुसलमान माणसाने आणलेले पाणी प्याल्याशिवाय तसेच 'मी जातिभेद | मानणार नाही' अशी प्रतिज्ञा घेतल्याशिवाय या सभेचे सभासद करून घेतले जात नसे. या सभेसाठी दादोबा पांडुरंगांनी प्रार्थना मराठीत रचल्या होत्या. मात्र या सभेचे कामकाज अत्यंत गुप्त रीतीने चालत असे. या सभेत सर्व धर्मांचे लोक होते. या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी 'पारमहंसिक ब्राह्मधर्म' हा काव्यग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी सभेतील तत्त्वज्ञानाची माहिती दिली आहे. जतिभेद मानू नये, बंधूभावाने वागावे, मूर्तिपूजा करू नये, एकेश्वरवादाचा पुरस्कार करावा असा उपदेश केला आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या सुधारणांची त्यांच्याच काही काव्यपंक्तीवरून कल्पना येते. उदा.

विश्वकुटुंबी जो । सर्वादि कारण | बापा त्या शरण | जावे तुम्ही | 

बंधुच्या नात्याने । वागा मानवाशी । उदार मनाशी । ठेवूनिया | 

जातिभेद सर्व । सोडा अभिमान । द्यावे आलिंगन । एकमेका ।

 भूतदयेने ती । करा देवपूजा । हेच अधोक्षजा । आवडले । 

करणे असेल । व्यर्थची नक्कल । तरी दोरी घाल । सुखे गळा ।

इ. स. १८६० पर्यंत परमहंस सभेचे कामकाज चालूच होते. परंतु या सभेतील सदस्यांची यादी चोरीस गेली. सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळे सभासदांच्यात प्रचंड खळबळ उडाली. अनेकांनी आपण त्यात नव्हतो असे सांगून अंग काढून घेतले. समाजातही प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत परमहंस सभा चालू ठेवणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन चालक मंडळींनी ती बंद केली. सतत १५ वर्षे दादोबा पांडुरंग आणि त्यांच्या पुरोगामी विचारसरणीच्या सहकाऱ्यांनी जे कार्य केले ते खचितच कौतुकास्पद आहे. पुढील काळात समाजाचे धर्मजीवन शुद्ध होण्यास या कार्याचा हातभारच लागला.

 शैक्षणिक कार्य

 मुंबई येथे एल्फिन्स्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसार व सामाजिक जागृतीच्या कार्यासाठी दादोबा पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली इ. स. १८४८ मध्ये "ज्ञान प्रसारक सभा" स्थापन केली. विद्येच्या लाभाविषयी त्यांनी जे व्याख्यान दिले आहे ते आजही विचार करावयास लावणारे आहे. ते म्हणतात, “ ज्ञानशक्तीचा प्रसार प्राचीन काळी आपल्यात खूप झाला होता. ज्यावेळी इतर देश अज्ञान अवस्थेत होते त्यावेळी आपण उत्तमावस्थेत होतो. आपणामध्ये पूर्वी व्यासादि ऋषी, कालीदास, भास्कराचार्य यांसारखे पंडित व शास्त्रज्ञ होते. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथरचना केली. त्यावेळचे त्यांचे श्रम आणि सांप्रतकालचे आमचे श्रम यामध्ये किती अंतर आहे. आपल्या पूर्वजांनी जो विद्यावृद्धीचा क्रम घालून दिला होता तो तसाच पुढे चालू राहिला असता तर आपली प्रगती किती झाली असती ? आपण पुन्हा एकदा सर्व मिळून आपल्या देशाची सुधारणा करण्याचा प्रयत्न करू या" पारंपरिक ज्ञानापेक्षा भौतिकशास्त्रांचे ज्ञान आपण मिळविले पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते होते.

 राजकीय कार्य  

राजकारणामध्येही दादोबा पांडुरंग यांनी मोलाची कामगिरी केली आहे. ब्रिटिशांच्या अन्यायी व अत्याचारी धोरणाविरुद्ध ते होते. बाँबे असोसिएशनने या संदर्भात जो अर्ज केला त्यात ते होते. ब्रिटिशांच्या पंक्तिप्रपंचावर त्यांनी टीका केली. मिठावरील कराच्या विरुद्ध इ. स. १८४४ मध्ये भारतीयांनी मोर्चा काढला. त्यावेळी सरकारने दडपशाहीचा वरवंटा फिरवून तो मोडून काढला. त्या संदर्भात दादोबा पांडुरंग म्हणतात, ज्यावेळी प्रजेवर अन्याय होतो त्यावेळी जनतेने शासनकर्त्याशी लढा देणे योग्यच असते. राज्य हे जनकल्याणासाठी असते. प्रजेसंबंधी समभाव राखणे गरजेचे आहे. जर शासनकर्ता जनतेला पीडा देऊ लागला, दारिद्री बनवू लागला तर लढा देणेच योग्य. " राज्यकर्त्यांच्या दोषांवर त्यांनी कधीच पांघरूण घातले नाही. ब्रिटिशांच्या अत्याचारास आमच्यातील अंधश्रद्धाळूपणा व अज्ञान कारणीभूत आहे, असे त्यांचे मत होते.

 वाङ्मयीन क्षेत्रातील कार्य 

दादोबा पांडुरंग यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे ग्रंथ प्रचार होय. त्यांना साहित्यिक दृष्टी होती. त्यांनी ग्रंथाचे प्रचंड भांडार लिहिले नाही परंतु जे लिहिले ते सर्व स्वतंत्रपणे लिहिले. त्यांनी मराठी भाषेचे 'व्याकरण', 'मराठी नकाशाचे पुस्तक, ' 'विधेच्या लाभाविषयी,' 'विधवाश्रमार्जन,' 'यशोदा पांडुरंगी,' 'मराठी लघु व्याकरण, ' 'पारमहंसिक ब्राह्मधर्म, ' 'आत्मचरित्र,' 'शिशुबोध' इत्यादी ग्रंथ लिहिले. 'यमुना पर्यटन' या बाबा पद्मनजींच्या कादंबरीला दादोबा पांडुरंग यांचा पुनर्विवाह विषयक संस्कृत लेख जोडला आहे. त्यावरून त्यांच्या ज्ञानाची कल्पना येते. दादोबांचा सर्वोकृष्ट निबंध म्हणजे 'यशोदा पांडुरंगी' ला जोडलेली टीकात्मक प्रस्तावना होय. त्यात सहृदयता, चिकित्सक बुद्धी व बहुश्रुतता यांचे दर्शन होते. मराठी भाषेत टीकेचा अपूर्व प्रकार त्यांनी प्रथम सुरू केला. मराठी भाषेबद्दल त्यांना अपार प्रेम होते. तिचा कोंडमारा होत होता, म्हणूनच त्यांनी शास्त्रशुद्ध व्याकरण लिहून मराठी भाषेच्या उद्धाराचे कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या व्याकरणाने त्यांची लोकप्रियता वाढविली आहे, म्हणूनच त्यांना “ मराठी व्याकरणाचे पाणिनी" असे म्हणतात,

 योग्यता

 दादोबा पांडुरंग तर्खडकर हे समाजसुधारक व धर्मसुधारक होते. महाराष्ट्रातील समाज अज्ञान, अंधकारात ज्यावेळी चाचपडत होता त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करण्याचे असामान्य कार्य केले. 'मानवधर्म सभा,' 'परमहंस सभा,' 'ज्ञान प्रसारक सभा ' स्थापन करून समाजाला आपल्या धर्माचे सत्य स्वरूप दाखविण्याचे कार्य केले. शिक्षण, लेखन, पुनर्विवाह इत्यादी संदर्भात त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे. एकेश्वरवाद, भौतिक शास्त्राचे शिक्षण, स्त्रीशिक्षण, जातीभेद न मानणे यांसारख्या तत्त्वांचा पुरस्कार केला. त्यांनी धर्माला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. राजकीय बाबतीत जागृतीची गरज प्रतिपादन केली. विविध विषयांवर ग्रंथ लिहून मराठी वाङ्मयाची सेवा केली. मराठी भाषेचे व्याकरण लिहून 'मराठी भाषेचे पाणिनी' हा किताब मिळविला. न्या. रानडे म्हणतात, “धर्म जिज्ञासा करणाऱ्या तत्त्वचिंतकांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग यांना अत्युच्य स्थान देण्यात यावे अशीच त्यांची योग्यता आहे."

महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांची कार्ये व माहिती

☯️ आधुनिक मुंबईचे शिल्पकार - जगन्नाथ शंकर शेठ (नाना)

☯️ मराठी वृत्तपत्राचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

☯️ मराठी भाषेचे पाणिनी- दादोबा पांडुरंग तर्खडकर 

☯️ लोकहितवादी- गोपाळ हरी देशमुख 

☯️ महाराष्ट्राचे धन्वंतरी - डॉ. भाऊ दाजी लाड 

☯️ विष्णुशास्त्री पंडित 

☯️महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग - महात्मा ज्योतिबा फुले

☯️भारतीय राज्यघटनेचे जनक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा