गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (इ. स. १८२३-१८९२) |
महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचारांना प्रर्वतक म्हणून गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांना ओळखले जाते. त्यांनी सामाजिक सुधारणा, राजकीय सुधारणा, शिक्षण इत्यादी क्षेत्रांत प्रमुख विचार मांडले. त्यांनी अंधश्रद्धेवर व समाजातील जातीयतेवर कठोर टीका केली. सामाजिक सुधारणेबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांच्या विचाराला त्या काळाच्या काही मर्यादा असल्या तरी त्यांचे लेखन व विचार समाजप्रबोधनयुक्त होते हे नाकारून चालणार नाही. उच्च वर्णीयांनी काळ ओळखून आपल्यात बदल केला पाहिजे असे त्यांनी आवेजून प्रतिपादन केले. त्यांनी ज्ञान, विज्ञान व बुद्धिवाद यांची कास धरली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसुधारणेच्या चिंतनात घालविले. महाराष्ट्रातील समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. अशा थोर समाजसेवकाचे प्रथम आपण थोडक्यात चरित्र पाहू.
|
गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म पुणे येथे १८ फेब्रुवारी १८२३ मध्ये झाला. त्यांचे उपनाव 'सिद्धेय' असे होते. त्यांचे वडील पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. त्यांना त्यांच्याकडून ३ गावची देशमुखी मिळालेली होती. त्यामुळे त्यांना देशमुख हे नाव मिळाले. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर ठराविक मुदतीत गव्हर्नर एल्फिन्स्टन यांना भेटण्यास त्यांचे वडील गेले नाहीत, त्यामुळे ती जहागिरी जप्त केली. परंतु बाजीराव पेशव्यांनी मध्यस्थी करून ती त्यांना परत मिळवून दिली. परंतु त्यांच्या हयातीपर्यंतच तिची मर्यादा होती.
गोपाळराव तेरा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठी आपत्ती कोसळली. वडिलांच्या मृत्यूबरोबर जहागीर जप्त झाली. ती परत मिळावी म्हणून गोपाळरावांचे ज्येष्ठ बंधू चिमणराव यांनी बरेच प्रयत्न केले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र त्यांच्या मातोश्रीला पेन्शन मिळाली. कुटुंबाची जबाबदारी त्या दोघांवर येऊन पडली. गोपाळरावांची शरीरप्रकृती चांगली होती. पोहण्याची, घोड्यावर बसण्याची व नेमबाजीची त्यांना आवड होती. त्याचबरोबर ते कुशाग्र बुद्धीचे होते. संतवाङ्याचा त्यांनी अभ्यास केलेला होता. १८४१ मध्ये ते इंग्रजी शाळेत दाखल झाले. तेथील अभ्यासक्रम त्यांनी चिकाटीने व परिश्रमपूर्वक तीन वर्षांत पूर्ण केला. आपल्या बुद्धिमत्तेची छाप त्यांनी शिक्षकांच्यावर पाडली होती. इतिहास हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. इतरही विषयांत त्यांची प्रगती वाखणण्याजोगी होती. त्यांनी याच काळात भाषांतर करण्याचे नैपुण्य मिळविले. त्यांनी संस्कृत ग्रंथातील काही सुभाषिते टिपून काढली होती. ज्ञानार्जनाच्या कोणत्याही साधनाची त्यांनी उपेक्षा केली नाही. संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी या भाषा त्यांना येत होत्या. त्यांच्यातील विद्याभिरुचीचे ते द्योतक होते.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरकारी खात्यात इ. स. १८४४ मध्ये भाषांतरकार म्हणून नोकरी मिळाली. तेथे त्यांना दरमहा ७७ रुपये पगार मिळत होता. अंगमेहनती, चिकाटी व कामाची शिस्त व उरक यांमुळे त्यांची दोन वर्षातच शिरस्तेदार या पदावर नियुक्ती झाली. उत्तरोत्तर त्यांची प्रगती होतच राहिली. १८४६ मध्ये ते मुन्सफची परीक्षा पास झाले. त्यामुळे १८५२ मध्ये त्यांना वाई येथे फर्स्टक्लास मुन्सफ या पदावर नेमले. ते आपल्या कामात अत्यंत दक्ष होते. काम करण्यात वक्तशीरपणा होता. त्यामुळेच त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर खूश असत. त्यानंतर १८५६ मध्ये त्यांना इनाम कमिशनवर असिस्टंट कमिशनर व कमिशनर या पदांवर नियुक्त केले. त्यांनी कायद्याप्रमाणे आपले काम केले. त्यामुळे अनेकांची इनामे त्यांनी जप्त केली. त्यामुळे लोकांच्यात त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण झाला. १८६२ मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज् व नंतर अहमदनगरला जज् म्हणून त्यांनी कार्य केले. १८६३ मध्ये सनदी नोकरीला आवश्यक असणारी परीक्षा ते पास झाले. नाशिकला त्यांची जॉईंट सेशन जज् म्हणून नेमणूक झाली. १८७९ मध्ये ३५ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना पेन्शन मिळाली. नोकरीच्या कालखंडातच त्यांना 'जस्टिस ऑफ पीस' व 'रावबहाद्दर' या पदव्या देऊन त्यांचा सरकारने गौरव केला होता. १८८० मध्ये मुंबई इलाख्याच्या विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. काही काळ त्यांनी रतलाम संस्थानाचे दिवाण म्हणूनही काम केले. अशा थोर पुरुषाचा मृत्यू १८९२ मध्ये झाला.
|
लोकहितवादी जसे समाजसुधारक ते श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिकही होते. त्यांनी बरेच दिवस साहित्य लिहिले आहे. लेखनाच्या स्पष्टीकरणासाठी आणि पुष्टीसाठी त्यांनी प्रस्तावना, तळटिपा आणि परिशिष्टे जोडली आहेत. त्यावरून त्यांच्या लेखनातील विवेचक बुद्धीची साक्ष पटते. त्यांच्या ग्रंथात विषयांची मांडणी व भाषाशैली या फार सरळ व मार्मिक आहेत. आपले पुरोगामी विचार लोकांना पटवून देण्यासाठी कोणाच्याही रागलोभाची त्यांनी पर्वा केली नाही. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची त्यांची तडफ असामान्य होती. त्यांचा अंतरीचा जिव्हाळा त्यांच्या प्रत्येक बाक्यात नव्हे, प्रत्येक शब्दांत प्रतिबिंबित झालेला आहे. वाङ्मयनिर्मितीमागील आपली भूमिका त्यांनी पुढील शब्दात स्पष्ट केली आहे, “लोकहितवादीने कोणाची मंजुरी पत्करली नाही, कशाची अपेक्षा, आशा किंवा इच्छा नाही. कोणाच्या सांगण्यावरून किंवा शिकविण्यावरून कृत्रिम वर्णन केले नाही. लाभावर अगर द्रव्यावर नजर ठेवून कीर्ती व्हावी या हेतूने लिहिले नाही. इतके श्रम जे केले ते लोकांस त्यांची वास्तविक स्थिती कशी आहे ती कळावी, त्यांनी सुधारावे, त्यास इहलोकी समृद्धी व्हावी, परलोकाचे साधन घडावे व बहुत काळापासून दृढ भ्रम झाले आहेत, त्यांपैकी काही अविचाराने व काही मूर्खपणाने जडलेले आहेत ते कमी व्हावे, इतक्याच हेतूने मी यथामतीने व स्वेच्छेने वेतनावाचून हे श्रम केले आहेत. "
भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर' या साप्ताहिकात लोकहितवादींनी इ. स. १८४८ मध्ये लिखाणास प्रारंभ केला. समाजाला उद्देशून लिहिलेली ती पत्रे आहेत. त्यांना 'शतपत्रे' म्हणून ओळखले जाते. ती त्यांच्या सुधारणावादी विचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. या शतपत्रात राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक विषयांचा त्यांनी परामर्श घेतला आहे. मात्र ही पत्रे एकाच विषयावर सलगपणे लिहिली गेली नाहीत. सुचेल तो विषय घेऊन लिखाण केलेले आहे. लोकहितवादींनी समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर मराठी भाषेत सुबोध व परिणामकारक चर्चा केली आहे. समाजातील अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांचा त्यांनी निर्भीडपणे ऊहापोह केला आहे. त्यांची भाषा साधी व सोपी असल्यामुळे वाचकांच्या अंत:करणाला जाऊन भिडत असे. शतपत्रातून लोभ, भ्रम, अंधश्रद्धा यांवर त्यांनी कठोर टीका केली आहे. आपल्या समाजातील दृष्टी रूढी, परंपरा दूर व्हाव्यात हा त्यामागील प्रामाणिक हेतू होता. एक प्रकारे ते लोकजागृतीचेच काम होते.
त्यांनी इंग्रजी भाषेचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता. परंतु कीर्तीच्या मागे लागून त्यांनी मातृभाषेला कधी ठोकरले नव्हते. साहेबांची मर्जी संपादण्यापेक्षा लाखो अज्ञानी बांधवांना ज्ञानदान करावे याच हेतूने त्यांनी लेखन केले होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर ३६ ग्रंथ लिहिले आहेत. त्यांची शोधकता व चिकाटी प्रत्येक ग्रंथात दिसून येते. राजकारण व अर्थकारण यांवर त्यांनी 'लक्ष्मीज्ञान', 'हिंदुस्थानास दारिद्रय येण्याची कारणे आणि त्यांचा परिहार व व्यापार विषयी विचार,' 'स्थानिक स्वराज्य व्यवस्था,' 'ग्रामरचना' यांसारखे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. लोकहितवादींनी ऐतिहासिक ग्रंथांची भरपूर निर्मिती केली आहे. लोकांच्यातील ज्ञानसंपादनेच्या वृत्तीबद्दल ते उदास व नाराज होते. त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास,' 'गुजरात', 'लंका' 'राजस्थान, ' 'पानिपत' इत्यादीवर ग्रंथलेखन केले. त्यांच्या प्रस्तावना मोठ्या मार्मिक आहेत. याशिवाय 'पृथ्वीराज चौहान' 'स्वामी दयानंद सरस्वती' यांची चरित्रे लिहिली आहेत. नीती, धर्म व समाजकारण यांवरही त्यांनी बरेच लेखन केले आहे. समाजाचा विकास व्हावा, समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट व्हाव्यात, आदर्श जीवनमूल्ये समाजात रुजावीत, भौतिकशास्त्रांच्या अभ्यासाची समाजाने कास धरावी यांबाबत त्यांनी अत्यंत तळमळीने लेखन केले आहे. जाती वैमनस्यामुळे आमची अधोगती होते आहे, हे भूत गाडले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.
|
लोकहितवादींनी सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा आग्रह धरला होता. त्यामुळेच त्यांनी समाजातील दोषांवर कडक टीका केली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा बाजूला सारून सामाजिक प्रगतीचा विचार करावा असा त्यांनी आग्रह धरला होता. भारतीय समाजाच्या अधोगतीला जातीसंस्था कारणीभूत आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी जातीसंस्थेवर कठोर टीका केली आहे. यासाठी त्यांनी इंग्रजांचे अनुकरण करावे असे प्रतिपादन केले आहे. शब्दप्रामाण्यापेक्षा बुद्धिप्रामाण्य स्वीकारावे असा त्यांनी आग्रह धरला होता. नवविचारांच्या स्वीकाराची मागणी त्यांनी केली होती. इंग्रजांत शिस्त, चिकाटी, उद्योगप्रियता, शौर्य, देशाभिमान आढळतो उलट आम्ही आळशी, भित्रे आणि स्वार्थी आहोत. सामाजिक दृष्टीने इंग्रज स्त्रीदाक्षिण्यवादी, सामाजिक विषमता न मानणारे आहेत तर आम्ही स्त्रीदाक्षिण्य पायदळी तुडवणारे, जातीयता मानणारे, आपपरभावाने विघटित झालेले आहोत असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले. समाज सुधारणेसाठी त्यांनी पुनर्विवाहास विशेष महत्त्व दिले होते. ते म्हणतात, “ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच केले व उभयतांचे अधिकार समसमान आहेत, असे असताना पुरुषास पुन्हा विवाहाची आज्ञा आणि स्त्रियांस मात्र मनाई हा केवढा जुलूम आहे." त्यांनी बहुपत्नीकत्व, हुंडा, बालविवाह या अनिष्ट पद्धतींवरही टीका केली आहे. स्त्रियांच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला होता. समाजात उद्योग वृद्धीसाठी एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्यासाठी त्यांनी विभक्त कुटुंब पद्धतीला सल्ला दिला होता. त्यांनी सामाजिक प्रश्नांचा अगदी बारकाईने अभ्यास केला होता असेच त्यांच्या विचारांवरून दिसून येते.
|
लोकहितावादींचा धर्मवाङ्मयाचा अभ्यास चांगला असल्याने धर्मांविषयी त्यांनी समतोल विचार मांडले आहेत. धर्माचा उगम मानवाच्या बुद्धीमध्ये झाला असे त्यांचे ठाम मत होते. आजचा धर्म हा अतिशय विकृत झाला आहे. धर्मांच्या नावावर अनेक निंद्य प्रकार घडत आहेत. आचारांचे स्तोम माज़ले आहे असे त्यांचे मत होते. समतेवर आधारलेल्या धर्माचा त्यांनी पुरस्कार केला. सामाजिक व आर्थिक अन्यायाचे निर्मूलन करणारा धर्म त्यांना अभिप्रेत होता. जुने धर्मग्रंथ अभ्यासून आणि त्यातील वचने प्रमाण मानून वागणे मूर्खपणाचे आहे असे ते स्पष्टपणे सांगत. धर्मांच्या नावावर निष्क्रिय राहून चालणार नाही. आपण कृतिशील राहिलो तरच आपली प्रगती होईल. मूर्तिपूजा करू नका. त्यांच्या या विचारामुळे समाजातील अनिष्ट आचार व निष्ठा थोड्या सैल होण्यास मदत झाली. लोकहितवादींना मानवी जीवनातील तात्त्विक समस्यांपेक्षा सामाजिक समस्यांचे अगत्य अधिक होते. म्हणून भौतिकवाद व बुद्धिवाद यांचे ओझरते दर्शन त्यांच्या धर्मविषयक लेखनात दिसून येते.
|
भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्यात जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षणाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे असे लोकहितवादी यांचे मत जुनी विद्या समाजाला आता उपयोगी नाही. समाजाची भरभराट होण्यासाठी पाश्चात्त्य भौतिक शास्त्रांचा अभ्यास करावा असे त्यांचे मत होते. जीवनाभिमुख ज्ञान मिळावे असा त्यांचा आग्रह होता. हिंदी लोकांना माणसे म्हणून जगावयाचे असेल आणि सुधारणावादी राष्ट्रांच्या मागे जावयाचे असले तर त्यांच्या जीवनपद्धती व शिक्षण यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. विद्या प्रसारासाठी मराठी शाळेत इंग्रजी शिक्षक नेमावेत, नॉर्मल स्कूल सुरू कराव्यात, वर्तमानपत्रांचा प्रसार व्हावा, जगप्रवास करावा, वाचनालये काढावीत. अशा अनेक उपयुक्त सूचना त्यांनी केल्या आहेत. लोकहितवादींनी “ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे" असे सांगून आधुनिक शास्त्रांचे ज्ञान संपादण्याचा उपदेश केला आहे.
|
लोकहितवादींनी राजकीय क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य केले नाही किंवा एखादी संघटनाही स्थापन केली नाही. मात्र त्यांनी लोकशाहीची पद्धत या देशात आली पाहिजे असे प्रतिपादन केले. त्यांचे हे विचार पुढील काळातील राजकीय चळवळीला मार्गदर्शक ठरतील. त्यांची राजकीय विचारांची सांगड आर्थिक विचारांशी जुळणारी होती. व्यक्तीत समानता असावी व व्यक्तिसुखात जो अडसर असेल तो राज्याने दूर करावा अशी त्यांची विचारसरणी होती. लोकहितवादींनी इंग्रजी शासनाचे फायदे सांगितले आहेत तसेच बहुजन सुखाच्या आड येणाऱ्या शासनकर्त्यावर टीकाही केली आहे. 'भाड्याचा उंट त्याजवर लादतालादता नाळी पडल्या तरी कोणी मनात आणित नाही. एकतर्फी काम चालते. दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचे राज्य चालवित आहे.' या त्यांच्या आक्षेपावरून शासनाबद्दल त्यांचे काय मत होते ते स्पष्ट होते. राजकीय पारतंत्र्याचे भान लोकहितवादींना होते. त्यादृष्टीने त्यांनी “आपण सर्व एकत्रित होऊन विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे आणि आपल्या देशात पार्लमेन्ट मागून घ्यावे" अशी सूचना केली आहे. आपल्या लोकांच्या स्वाभिमानशून्यतेची त्यांना चीड होती. लोकहितवादींना स्वराज्याची ओढ होती. कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा वर्गाचे राज्य नको होते. समाजाच्या सर्व थरातील लोकांचे लोकसत्ताक राज्य व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती. ब्रिटिश पार्लमेन्ट हे हिंदुस्थानातील कारभारासंबंधी सवतीच्या मुलाप्रमाणे उदासीन आहे. प्रजेच्या न्याय हक्कासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे असा त्यांचा सल्ला होता. त्यांची एकूण विचारप्रणाली पाहिली तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक म्हणून लोकहितवादींना संबोधण्यास काही हरकत येईल असे वाटत नाही.
|
लोकहितवादींनी भारतीय जनतेच्या आर्थिक दुरावस्थेचे चित्र रेखाटले आहे. प्राचीन काळी भारत देश आर्थिकदृष्ट्या सुखी होता. पुढे लोकसंख्या वाढली. त्यात परकियांच्या आगमनाने भर पडली. त्या प्रमाणात उत्पादनाची साधने वाढली नाहीत. भारतीयांचा आळस, अज्ञान व इंग्रजांचा व्यापार यांमुळे दारिद्रयात भरच पडत गेली असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वसमाजाला स्वदेशीचा व उद्योग संस्कृतीचा उपदेश केला.
|
लोकहितवादींच्या विचारांची झेप आपण वर पाहिलीच आहे. त्यामुळे त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादाची साक्ष पटते. सरकारी नोकरीत असल्यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विचारांना ते प्रत्यक्ष कृतीने साथ देऊ शकले नाहीत. यामुळे त्यांच्या विचारांचे महत्त्व कमी होत नाही. लोकहितवादींचा काळ महाराष्ट्रातील विचार संक्रमणाचा काळ होता. आणि आचारातही जुन्या नव्याचा संघर्ष चालू होता. अशा काळांतील व्यक्तींच्या विचारात आणि आचारात कित्येक बाबतीत विसंगती आढळते. तसेच लोकहितवादींच्या बाबत झालेले आढळते. समाजातील जुन्या आचारावर ते कडक टीका करीत पण स्वतःच कित्येक जुन्या • सवयींना चिकटून राहत. अशा वेळी विरोधकांकडून असा आक्षेप घेतला जाई की ते नुसते बोलके सुधारक आहेत. ज्यावेळी सुधारणेची तत्त्वे आवेशाने सांगणे हीच मुख्य गरज असते, त्यावेळी ती सांगणे हाच कर्तेपणा ठरतो. ज्यावेळी समाज रूढी-परंपरेच्या वेटोळ्यात अडकला होता त्यावेळी लोकहितवादींनी त्यांना विकासाचा मार्ग दाखवून दिला.
लोकहितवादींनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय प्रश्नांवर पुरोगामी विचार मांडले. धर्मातील अनिष्ट प्रथांवर टीका केली. मानवी जीवनाकडे पाहणारा परंपरागत दृष्टिकोण बदलला पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. आपल्या वृत्तपत्रीय व ग्रंथलेखनातून त्यांनी आपला देश व समाजस्थितीचे प्रभावी चित्रण करून समाजाला मार्गदर्शन केले, त्यांनी आधुनिक शिक्षणाची बैठक घालून दिली. आर्य समाजाच्या कार्यातही त्यांनी लक्ष घातले होते. यावरून त्यांचा दूरदर्शीपणा दिसून येतो. ते या समाजाच्या कार्यासाठी नेहमी व्याख्याने देत. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर 'लोकहितवादी' हे मासिक सुरू केले. डॉ. ना. सि. इनामदार म्हणतात, 'पेशवाईच्या अस्तानंतर संधिकाळात व संक्रमणावस्थेत जी वैचारिक क्रांती या भागात झाली तिचे नेतेपद लोकहितवादींना बहाल करण्यास प्रत्यवाय नाही. त्यांनी पारतंत्र्याचे निदान केले, स्वातंत्र्याचे उपाय सांगितले. राज्यपद्धती सुचविली. इंग्रजी राज्याचे गुणदोष दाखविले. लोकशाहीचा मंत्र सांगितला. आर्थिक अवनीतीची मीमांसा केली. उदारमतवादी विचार मांडले. सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले म्हणून इंग्रजी काळातील बुद्धिवादी नेता असेच त्यांचे वर्णन करणे योग्य ठरेल." बुद्धिप्रामाण्यवादास त्यांनी महत्त्व दिले. कालानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावेत, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान द्यावे, आळशीपणा सोडून उद्योगी व्हावे, लोकसत्ताक शासनपद्धती, स्वदेशी, निवृत्तीवादापेक्षा प्रवृत्तीवाद श्रेष्ठ असे वेगवेगळे मार्ग त्यांनी समाजसुधारणेसाठी दाखवून दिले. लोकांचे भले व्हावे, त्यांची प्रगती व्हावी यासाठीच ते झटत. म्हणूनच त्यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते.
महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांची कार्ये व माहिती
☯️ आधुनिक मुंबईचे शिल्पकार - जगन्नाथ शंकर शेठ (नाना)
☯️ मराठी वृत्तपत्राचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर
☯️ मराठी भाषेचे पाणिनी- दादोबा पांडुरंग तर्खडकर
☯️ लोकहितवादी- गोपाळ हरी देशमुख
☯️ महाराष्ट्राचे धन्वंतरी - डॉ. भाऊ दाजी लाड
☯️महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग - महात्मा ज्योतिबा फुले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा