|
भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्राची आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ ओळखले जातात. नाना म्हणजे बुद्धी, विद्वता आणि कर्तृत्व यांचा महामेरू होते. त्यांच्या या गुणास श्रीमंती आणि दातृत्व यांची जोड मिळाली होती. ते एक सार्वजनिक कार्यकर्ते होते. सामाजिक प्रबोधनात आणि ते सार्वजनिक जीवनात त्यांनी मोलाची भर घातली आहे. नाना हे जनतेचे स्वयंभू नेते होते. परकीय राज्यकर्त्यांत आणि जनतेत त्यांचा विलक्षण दरारा होता. त्यांनी शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा विविध कार्यांत भाग घेऊन अनेक नवीन उपक्रम राबविले. महाराष्ट्रीय समाजाला त्यांनी आपल्या कार्याने गतिमान केले.
|
१० फेब्रुवारी १८०३ मध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे दैवज्ञ ब्राह्मण (सोनार) होते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव. तसेच मुर्कुटे हे त्यांचे उपनाम होते. त्यांचे वडील शंकरशेठ यांनी मुंबईत जवाहिन्यांच्या व्यवसायात फार मोठी संपत्ती मिळविली होती. नाना लहान असतानाच त्यांची आई वारली. वडिलांनी मातेविना पोरक्या मुलाचा चांगला सांभाळ केला. यथायोग्य प्रकारचे शिक्षण त्यांना दिले गेले होते. त्यांच्या वयाला १८ वर्षे पूर्ण झाली त्याच वेळी त्यांचे वडील मृत्यू पावले. त्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर प्रचंड अशा उद्योगधंद्याची जबाबदारी पडली. ज्याकाळात शाळा नव्हत्या, महाविद्यालये नव्हती, त्याकाळात विद्या संपादन करणे किती अवघड असले पाहिजे याची कल्पना केली तरी तो काळ आपणास समजू शकेल. नानांना प्रारंभापासूनच विद्येची आवड होती. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत नानांनी विलक्षण प्राविण्य मिळविले होते. त्यामुळेच पुढील काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप राज्यकर्त्यांवर पडली.
नानांनी आपला व्यवसाय अत्यंत चिकाटीने व सचोटीने केला. अमाप संपत्ती असूनही तिचा विनियोग विलासी जीवनासाठी न करता जनतेच्या कल्याणासाठी करण्याचेच त्यांनी ठरविले होते. मुंबईच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी तन, मन, धनाने भाग घेतला. त्यांनी मुंबईच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात अजोड असे कार्य केले. अनेक शैक्षणिक, राजकीय व सामाजिक संस्थांशी त्यांचे संबंध होते. सामाजिक कार्यकर्त्यांना कार्य करण्यास ते प्रोत्साहन देत राहिले. अनेक संस्थांना आणि गोरगरिबांना आर्थिक साहाय्य करून आपले दातृत्त्व सिद्ध केले. ते धार्मिक वृत्तीचे होते. व्यायाम, विद्या व धर्म यांबाबत त्यांना विलक्षण प्रेम होते.
मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते इ. स. १८५०-५६ पर्यंत सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून नानांची नियुक्ती झाली होती. म्युनिसिपल कमिशनवरही ते सदस्य म्हणून काम पाहत होते. सरकारने त्यांना "जस्टिस ऑफ दी पीस" हा सन्मान दिला होता. जनतेला न्याय मिळावा म्हणून राजाने नेमलेले प्रतिनिधी असा जे. पी. चा अर्थ होता. त्यांनी या पदाचा खऱ्या अर्थाने उपयोग करून घेतला. त्यांनी जनतेची गाणी सचोटीने सोडविण्याचा प्रयत्न केला. नानांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा इ. स. १८६५ मध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी अनेक वक्त्यांनी त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. इ. स. १८६५ मध्येच त्यांचा मृत्यू झाला.
|
नाना शंकरशेठ यांचे शैक्षणिक कार्य अद्वितीय आहे. मुंबई इलाख्यात ब्रिटिश राजवट स्थिरावण्यासाठी गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी फार मोठे परिश्रम घेतले. लोकांच्यात सुधारणा कशा कराव्यात हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे होता. त्यावेळी नानांनी एल्फिस्टनला स्पष्टपणे सांगितले ते असे, “विद्यादानाखेरीज आमच्या लोकांचा उद्धार होणार नाही.' साहेबांना हे विचार पटले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात नानांच्या सहकार्याने कार्य करण्यास सुरुवात केली. नानांनी मात्र केवळ सरकारवर विसंबून न राहता स्वतः पुढाकार घेऊन इ. स. १८२२ मध्ये “बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी" ही संस्था स्थापन केली. देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने स्थापन झालेली ती पहिलीच संस्था होती. या संस्थेमार्फत मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या. त्यांना या कामी बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवराव छत्रे यांचे फार मोठे सहकार्य लाभले. याशिवाय नानांनी अनेक शिक्षणसंस्थांना उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या.
एल्फिन्स्टन यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांच्या निवृत्तीनंतर स्मारक उभारण्यासाठी नानांनी पुढाकर घेऊन एक फंड जमविला. त्यांचे ते स्वतः विश्वस्त होते. या फंडातून उच्च शिक्षण देण्यासाठी आणि एल्फिन्स्टन साहेबांचे नाव कायम राहावे म्हणून 'एल्फिन्स्टन कॉलेज" सुरू करण्यात आले. सरकारने शिक्षणप्रसाराच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. त्याच्यावर नानांची नियुक्ती केली. इ.स. १८५६ मध्ये त्या बोर्डाचेच सरकारने विद्याखात्यात रूपांतर केले. मुंबई इलाख्यात शिक्षणाची घडी नीट बसविण्याच्या कार्यात नानांचा सहभाग महत्त्वाचा होता हे विसरून चालणार नाही.
इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे जनतेत जागृती होत होती. सार्वजनिक हिताची आवड तरुणांच्यात निर्माण झाली होती. ती वाढावी म्हणून इ. स. १८४५ मध्ये दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 'स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसयटी' ची मुंबईत स्थापना केली. या संस्थेला नानांनी सर्वातोपरी सहकार्य केले. मुलींना शिक्षण दिले तर त्यांच्या नवऱ्याचे आयुष्यमान कमी होते असा लोकांच्यात गैरसमज प्रस्तूत होता. त्यावेळी नानांनी स्वतःच्या जागेत 'जगन्नाथ शंकरशेठ' मुलींची शाळा काढली. त्याकाळात स्त्रियांच्या शिक्षणाचे कार्य करणे म्हणजे निंदानालस्ती व छळ करवून घेणे असे होते. नानांनी त्यास भीक न घालता स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. हे कार्य त्यांच्या धाडसाचे तसेच दूरदृष्टीचे एक उत्तम उदाहरण आहे. रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात नानांचा सहभाग महत्त्वाचा होता. इ. स. १८५९ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तिचे पहिले फेलो म्हणून नानांची नियुक्ती झाली. यावरून त्यांच्या शैक्षणिक कार्याची महती कळते. मुंबई इलाख्यात शिक्षणाचा पुढील काळात जो वृक्ष फोफावला त्याचे बीजारोपण नानांनीच केले होते. या संदर्भात दादाभाई नौरोजींनी असे म्हटले आहे, "आपण भारतीय लोक जगन्नाथ शंकरशेठचे ऋणी राहिलो पाहिजे, कारण त्यांनी शिक्षणाचे बीजारोपण करून त्याची जोपासणी केली व अत्यंत काळजीपूर्वक वाढ केली " असे अमोल शैक्षणिक कार्य करणाऱ्यात ते अग्रणी होते. नानांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून इ. स. १८५७ मध्ये 'दि जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल काढण्यात आले. तसेच नानांच्या चिंरजीवानी त्यांच्या स्मरणार्थ एस्. एस. सी. परीक्षेत संस्कृत विषयात पहिला व दुसरा येणाऱ्या विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती ठेवली आहे. भारतीयांना कलाविषयक शिक्षण मिळावे यासाठी नानांनी खूप प्रयत्न केले व त्यातूनच आजचे 'जे जे स्कूल ऑफ आर्ट' हे महाविद्यालय निर्माण झाले.
|
सामाजिक सुधारणेबाबत नानांचे विचार पुरोगामी होते. मराठी माध्यम, स्त्रीशिक्षण, सतीबंदी, शुद्धीकरण इ. सुधारणांना त्यांनी चालना दिली. स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य हाती घेणाऱ्या समाजसुधारकांना त्यांनी प्रोत्साहन व साहाय्य केले होते. समाजहितासाठी केलेल्या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी लोकमत अनुकूल व्हावे लागते हे नानांनी ओळखले होते. त्यांनी या क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावली सतीबंदीच्यावेळी नानांनी ही चाल अमानुष आहे असे लोकांच्या मनावर बिंबवले. त्यामुळे या कायद्याला महाराष्ट्रात कोठेही विरोध झाला नाही. मुंबई इलाख्याच्या कौन्सिलमध्ये निवडून आल्यानंतर नानांनी म्युनिसिपल अॅक्ट व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. इ. स. १८४६ मध्ये तो कायदा पास झाला. त्यानुसार मुंबई शहराच्या आरोग्याची आणि सुखसोयीची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र म्युनिसिपल कमिशन नेमण्यात आले. त्यावर नानांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी त्याद्वारे मुंबईच्या नागरी जीवनाची मुहूर्तमेढ रोवली. या संदर्भात दिशांना वाच्छा म्हणतात, "मुंबई म्युनिसिपालिटीचा जो भव्य पसारा आपण पाहतो त्याचे श्रेय त्यावेळच्या सरकारी अधिकाऱ्यांइतकेच नामदार जगन्नाथ शंकरशेठ यांना द्यावे लागले."
मुंबईच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनात परिवर्तन करण्यासाठी स्थापन झालेल्या सर्व संस्थांत नानांचा सहभाग होता. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेचे एक भव्य ग्रंथालय आहे. त्याला नानांनी फार मोठी मदत केली आहे. विज्ञानावरील अनेक मौल्यवान ग्रंथ त्यांनी स्वतः घेऊन या संस्थेला दिले आहेत. 'अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी आणि जॉग्रफिकल सोसायटी' यांच्या स्थापनेत नानांचा वाटा सिंहाचा होता. राणीच्या बागेतील पदार्थसंग्रहालयास त्यांनी भरपूर मदत दिली होती. नानांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे बोरीबंदर ते पुणे अशी रेल्वे सुरू करण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नामुळे ती सुरू झाली. त्यामुळे मुंबई इतर महाराष्ट्राला जोडली गेली. दळणवळणाच्या सुविधेबद्दल नानांची दूरदृष्टी कोणती होती हे यावरून स्पष्ट होते. नानांनी आपल्या हयातीत अव्याहतपणे लोकसेवा केली. त्याचे फळ म्हणजेच त्यांच्या हयातीत त्यांचा संगमरवरी पुतळा उभारण्यात आला.
सरकार आणि जनता यांचा नानांनी पूर्ण विश्वास संपादन केला होता. त्यांच्या घरात जनतेला मुक्तद्वार होते. इ. स. १८३७ मध्ये भिवंडीत जातीय दंगल झाली. विठ्ठलाची मूर्ती फोडण्यात आली. हिंदूंनी मुस्लिमांच्या विरुद्ध कोर्टात फिर्याद दाखल केली. निकाल हिंदूच्या विरुद्ध लागला. लोक नानांच्याकडे आपली गाऱ्हाणी घेऊन गेले. नानांनी गव्हर्नरांची भेट घेऊन खटल्याची फेरतपासणी करविली. दंगेखोरांना कडक शिक्षा होऊन हिंदूना न्याय मिळवून दिला. इ. स. १८३६ मध्ये सरकारने सोनापूरची स्मशान भूमी शिवडीला हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जनतेच्या अनेक गैरसोयी होणार होत्या. जनता या निर्णयाविरुद्ध प्रक्षुब्ध झाली होती. जनतेच्या भावना लक्षात घेऊन नानांनी प्रयत्न केले. लोकांच्या गैरसोयी गव्हर्नरांना पटवून दिल्या. शेवटी गव्हर्नरांनी तो निर्णय रद्द केला. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला भरपूर पाणीपुरवठा व्हावा म्हणून विहीर-तलावाची योजना नानांनी आखली. चिंचपोकळीतील गॅस कंपनी त्यांच्याच प्रयत्नामुळे झाली. मुंबईत नाट्यगृह व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्याखेरीज दवाखाने, धर्मशाळा, मंदिरे इत्यादींना त्यांनी सढळ हाताने मदत केली.
|
नानांचा लोकसेवेचा दृष्टिकोण व्यापक होता. ते लक्ष्मीपुत्र असूनही त्यांनी जनसेवेचे व्रत अंगीकारले होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा व्हावी असा त्यांचा दृष्टिकोण होता. जनतेच्या अडीअडचणी, दुःखे यांना वाचा फोडून ती सरकारकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न नानांनी आयुष्यभर केला. महाराष्ट्रात नुकतीच इंग्रज राजवट स्थिरावत होती. काही उदारमतवादी गव्हर्नरांनी लोकहिताला प्राधान्य देण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अशावेळी शासनकर्त्यांना सहकार्य करून सत्तेचा लोकांच्या हितासाठी वापर करून घ्यावा असा विचार नानांनी केला होता.
जनतेची दु:खे सरकारला दाखविण्यासाठी व सरकारच्या लोकहिताच्या योजनांना सहकार्य करण्याच्या हेतूने नाना शंकरशेठ व दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेऊन इ. स. १८५२ मध्ये 'बॉम्बे असोसिएशन' ही संस्था मुंबई शहरात स्थापन केली. नंतरच्या काळात ही संस्था राजकीय चळवळीचे केंद्र बनली. या संस्थेच्या संदर्भात त्यांनी काढलेले उद्गार पुढीलप्रमाणे, या देशातील जनतेचे कल्याण करावे अशी इंग्रज सरकारची इच्छा आहे हे खरे, पण आमची अशी काही दुःखे आहेत की सरकारच्या नजरेस येत नाहीत. म्हणून ती सरकारच्या नजरेस आणून द्यावीत आणि रयतेच्या सुखाकरिता सरकारला हरएक गोष्टीत साहाय्य करावे म्हणून ही संस्था काढली आहे.
या संस्थेमार्फत हिंदी लोकांना कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून बरेच प्रयत्न केले. परिणामी इ. स. १८६१ मध्ये हिंदी लोकांना कायदेमंडळात प्रवेश मिळाला. नाना मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होणारे पहिले हिंदी गृहस्थ ठरले. कायद्याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. इंग्रजीवर प्रभुत्व होते. तसेच कोणत्याही प्रश्नाचा ते सखोल अभ्यास करीत, चिंतन करीत. त्यामुळे त्यांची छाप अधिकाऱ्यावर पडत असे. त्यांचे सरकारात वजन निर्माण झाले होते. इं. स. १८३५ मध्ये त्यांची जस्टिस ऑफ पीस या पदावर नेमणूक झाली. हिंदी लोकांना ग्रॅडज्युरीमध्ये नेमावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. स्मॉल कॉज कोर्टातील खटले चालविण्याचा अधिकार फक्त बॅरिस्टर पदवी संपादन करणाऱ्यांनाच होता. त्यांची फी फार असे, सामान्यांना ती परवडत नसे. त्यांचे हाल होत. यासाठी नानांनी आपले सरकारमध्ये असलेले वजन खर्च करून स्मॉल कॉज कोर्टात काम करण्यास वकिलांना परवानगी मिळवून दिली. इंग्रजांच्या अमदानीत काळा गोरा असा भेद सर्वत्र केला जात होता. वर्णभेदामुळे भारतीयांना वाईट वागणूक मिळत होती. हा वर्णभेद नाहीसा व्हावा व त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत या मताचे नाना आग्रही होते. या त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कार्यामुळे त्यांची दृष्टी किती सूक्ष्म होती हे दिसून येते.
|
नाना शंकरशेठ यांनी विविध क्षेत्रांत केलेले कार्य त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देण्यास पुरेसे आहे. आधुनिक भारत निर्माण करणाऱ्या आद्य पुरुषांत नानांचा समावेश केला जातो. मुंबईचे ते जनक होते हे निर्विवाद त्यांचे जीवन म्हणजे मुंबईचा इतिहास. परकीय राजकर्त्यांपुढे कोणतीही लाचारी न पत्करता किंवा लोकहिताला कोणत्याही प्रकारे मुरड न घालता राजा आणि प्रजा ह्यांचा विश्वास नानांनी संपादन केला होता. ते निस्पृह राजकीय व सामाजिक कार्यकर्ते होते. शिक्षणाच्या उभारणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल त्यांना तळमळ होती. म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी खास शाळा काढल्या. मराठी भाषेतून शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. वेगवेगळ्या संघटना स्थापून त्या उभारण्यासाठी आपले आयुष्य व धन अर्पण केले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक होते. सर्वांगीण सुधारणेचे ते प्रवर्तक होते. त्यांच्या कार्याविषयी आचार्य जावडेकर म्हणतात, “ लोकांच्यावतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी असे त्यांना म्हणण्यास काही हरकत नाही." आचार्य अत्रे म्हणतात, 'मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ही पदवी त्यांना यथार्थ ..
आहे" मुंबईमध्ये होऊन गेलेल्या अलौकिक चारित्र्याच्या आणि कर्तृत्वाच्या माणसांतील ते श्रेष्ठ माणूस होते. त्यांनी आधुनिक मुंबईचा पाया घातला. नाना हे जनतेचे स्वयंभू नेते होते. बुद्धी, विद्वता, कर्तृत्व यांचा ते महासागर होते.
महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांची कार्ये व माहिती
☯️ आधुनिक मुंबईचे शिल्पकार - जगन्नाथ शंकर शेठ (नाना)
☯️ मराठी वृत्तपत्राचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर
☯️ मराठी भाषेचे पाणिनी- दादोबा पांडुरंग तर्खडकर
☯️ लोकहितवादी- गोपाळ हरी देशमुख
☯️ महाराष्ट्राचे धन्वंतरी - डॉ. भाऊ दाजी लाड
☯️महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग - महात्मा ज्योतिबा फुले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा